किती कठीण तो जुना काळ
काहीही कळवायला लागे वेळ
आज क्लिक करता एक
साऱ्याच गोष्टींचा होईल मेळ
आताच्या परिस्थितीचे वर्णन अगदी अचूक करणाऱ्या या ओळी. परवा आपल्या लाडक्या व्हाट्सअँप वर एक मेसेज वाचला. काय तर म्हणे लोकांची सामाजिक माध्यमावरची (सोशल मीडिया) सक्रियता कमालीची वाढते आहे.थोडा विचार केला, आणि तोंडातून उद्गार बाहेर पडले,
'ह्या बातमीपेक्षा या गोष्टीचे अप्रूप वाटते की ही बातमी जिथे वाचत आहोत ते सुद्धा एक समाज माध्यमच आहे. आणि ते सुद्धा सर्वात जलद आणि प्रभावी...'
आज असा कोणी नसेल ज्याला किमान व्हाट्सएप, फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या समाज माध्यमांचे ज्ञान नसेल. तुमच्या आमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहेत ही सर्व समाज माध्यमे. अगदी लहान मुलांनासुद्धा एक विशिष्ट वर्चस्ववादी वेड आहे असं म्हणायला हरकत नाही. जग जोडायला आणि माणसाला माणसाशी जोडून ठेवण्यासाठी समाज माध्यमांनी आपले महत्त्व नक्कीच सिद्ध केलं आहे. खरं बघायला गेलं तर समाज माध्यमं ही आपल्यासाठी जास्त जुनी नाहीत अगदी अलिकडचीच आहेत. पण आपण त्याला किती बळी पडतोय हे आपल्याला वेगळं सांगायला नको... सर्वांची सकाळ भले भूपाळीने होत नसेल पण गुड मॉर्निग चे मेसेजेस सेंड आणि रिसिव्ह करून नक्कीच होते. एखादा नवीन पदार्थ बनला की तो खायच्या आधी स्टेटस वर जातोच जातो. चवीचं माहीत नाही पण रिप्लाय मिळाला की समाधान नक्कीच मिळतं. अर्थात यात वाईट अस काहीच नाही. समाज माध्यमांचा शोध हा माणसांना जोडण्यासाठीच झालेला आहे यात तिळमात्र शंका नाही. माणसाची खूप अवघड वाटणारी कामे आज चुटकीसरशी शक्य होत आहेत. आणि बहुतेक यातूनच आपला त्यांच्यावरचा विश्वास अधिकाधिक दृढ होत चालला आहे.
रोजचीच रोजची कामे करून कंटाळलेले खूप स्टेटस आपणच ठेवतो आणि जेव्हा अप्रत्यक्षपणे, कुठल्या का कारणाने असेना या साऱ्या रामरागाड्यातून आपणाला उसंत मिळाली तेव्हा पण आपण त्याला कंटाळतो आणि हे व्यक्त होतो सुद्धा त्या स्टेटस मधूनच. मला तर खरच वाटत स्टेटस हेच भाषेपेक्षा आपलं व्यक्त व्हायचं साधन झालंय. पण मूळ मुद्दा हा आहे की आपण काही स्टेटस 'मला किती माहिती आहे आणि मी या गोष्टी कशा सगळ्यांना सांगेन' या उत्सुकतेपोटी ठेवतो आणि मेसेजेस फॉरवर्ड करताना सुद्धा आपल्या डोक्यात बहुधा हेच असतं.
आज माहितीच्या साधनांमध्ये पुस्तकांच्या बरोबरीला आपला सो कॉलड 'स्मार्ट'फोन येऊन बसलाय. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी सोशल मीडियासारखं प्रभावी माध्यम नाही हे मान्य आहे. पण आज नक्की लिहू वाटत की याचा जितका तुम्हाआम्हाला फायदा आहे त्याहून नक्की जास्त तोटा आहे. तुम्ही आम्ही या फॉरवर्डच्या दलदलीत रुतत चाललो आहे आणि त्यासाठी आपण वैचरिकदृष्टीने सक्षम असणं नक्कीच गरजेचं आहे. आज जेवढ्या तत्परतेने भाजीची निवड करतो, जितक्या उत्तमरित्या नवीन फोन घेताना विचार करतो तसेच मेसेजेस आणि स्टेटस ची निवड करताना तत्पर असणं आवश्यक आहे.
आपण सारे रोजच ऐकतो की कोरोनासारखा आजार बळावतोय, खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चाललीय आणि बरच काही...आणि जेव्हा वेळ येते थोडासा विचार करायची की आपण सर्वात आधी कुठल्या माहितीवर विश्वास ठेवतो? टीव्ही वरच्या माहितीच्या आधी जिथून माहितीचा कुठलाच पुरावा नाही अशा ठिकाणच्या माहितीवर आपण कसा विश्वास ठेवू शकतो? कोणी तर उठतं, काही तरी बोलत, अफवा पसरवल्या जातात आणि आपण त्या 'फॉरवर्ड'च्या बटणाचा गैरवापर करून त्या गावभर करायला सज्ज असतोच, हो ना?
खरंच जर आपण एक जबाबदार नागरिक आहोत तर आपण नको का विचार करायला की ह्या ज्या आणि जेवढ्या बातम्या येतात त्यांची शहानिशा करणं ही नागरिकांची जबाबदारी असते अस नाही का वाटत आपणाला... तुमच्या या चुकीच्या फॉरवर्ड मुळे जर सर्वांमध्ये भीतीच वातावरण होऊन कोणी या माहितीला बळी पडलं तर ते किती भीषण असेल याचा विचार आपण का नाही करत?
परवा परवा ची गोष्ट बघा, देश संकटाला संपूर्ण ताकतीने समोरा जातोय आणि टिक टॉक सारख्या अँप वर बनवलेले विडिओ व्हायरल झाले ज्यामध्ये एका विशिष्ट धर्माचे लोक नोटांना थुंकी लावत होते. आणि नंतर तपासाअंती स्पष्ट झालं की विडिओ 3 वर्षांपूर्वीचा होता पण तोवर समाजामध्ये संबंधित धर्माबद्दल खूप रोष झाला होता आणि त्याला इतर कारणं होती हे ही खरं आहे. पण असे व्हिडीओ नाही का अशा चुकीच्या वेळप्रसंगी चुकीच्या गोष्टी करतील. खरंच आपण का विचार करत नाही की आता जर यामुळे कसलीच गर्दी वगैरे झाली तर हे संकट अजूनच वाढत जाईल? तुमच्याआमच्यासारख्या लोकांवर वस्तुस्थितीपेक्षा जास्त ह्या सोशल मीडियावरच का एवढा विश्वास आहे. कधी आपण एखादी गोष्ट पारखून घ्यायला शिकणार आहे देव जाणे.
अजून किती बळी घेऊन
संपेल तुझा मूर्खपणा मानवा
तुझ्याच चुकांचा परिणाम हा उलटा
तुझ्या नाशाला कारण मानवा
हे झालं फक्त कोरोनाचं! कोरोना नव्हता तेव्हा सुद्धा विचारशून्यपणे काही लोकांचे हे असले उद्योग सुरूच होते हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. कुणीतरी चिथावणीखोरपणे बोलावं, कोणी मुर्खपणे एखाद्या महान व्यक्तीबद्दल चुकीचे उद्गार काढावेत तसे व्हिडिओ व्हायरल व्हावे आणि शांत असणाऱ्या समाजाच्या विशिष्ट गटांमध्ये धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण व्हावी, दंगली व्हाव्यात आणि शेवटी सर्वांचंच नुकसान व्हावं हे अगदी नेहमीच झालंय. याचा अर्थ असा नाही की कोणी कुणाबद्दल काहीही बोलावं.... पण ते मेसेजेस आणि विडिओ फॉरवर्ड करण्यापेक्षा कायद्याचा वापर करणं यापेक्षा उपयोगी पडेल हे कळायला का आपली बुद्धी धजावत नाही हाच खरा प्रश्न आहे.
अगदी उदाहरणादाखल सांगायचं झालं तर भीमा कोरेगावची दंगल झाली त्यानंतर दोन ते तीन दिवस महाराष्ट्र बंद होता. या तणावाचे कारण नाही म्हणलं तरी काही समाजकंटक माणसांनी उठवलेल्या खोट्या अफवा हाच होता. दंगल झाली एका कारणावरून आणि राजकारणाचा आणि जातीचा रंग फासणाऱ्यांनी याच्या परिणामांचा थोडा सुद्धा विचार करू नये?
आज समाज माध्यमांमुळे रानु मोंडल सारख्या व्यक्ती रातोरात स्टार होतात आणि त्याच गोष्टीच्या नाण्याची दुसरी बाजू म्हणून अशा दंगली आणि मारामाऱ्या होतात. आणि तस बघायला गेलं तर समाजकंटकांना किती दोष देणार तुम्ही.... " नाही ओ, ते आलं होतं व्हाट्सऍप वर आलं होतं" हे कारण देऊन किती दिवस आपण अशा गोष्टींना उत्तेजना किती दिवस देणार आहात.
आपलं खरंच उनाड वासरू झालंय, ते उनाड वासरू जे किती भरकटत कुठे जातोय याबद्दल विचार सुद्धा करत नाही. प्रौढ म्हणूवून घेणं वेगळी गोष्ट आहे आणि जाणिवेचं प्रौढत्व येऊन तशी कृती करणं त्याहून वेगळी गोष्ट आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. एक मेसेज फॉरवर्ड करण्याआधी आपण सामाजिक जाणिव राखणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वैचारिक दृष्टीने तितकंच परिपक्व असणं गरजेचं आहे या गोष्टीची जाणीव करून घेणं आज नेटकऱ्यांना नक्कीच गरजेचं आहे. नाहीतर असंच चालू राहील आणि अफवांच्या फॉरवर्ड्स ना आपण बळी पडत राहिलो तर ती कोरोना पेक्षा मोठी शोकांतिका असेल हे मात्र नक्की.
आज समाजाला जर सुधारायचे असेल तर शिक्षणापेक्षा सज्ञानी आणि विवेकी बनवणं हाच एक उपाय आहे. गैरसमज किंवा समाजकंटकपणा आपल्यासोबत इतरांच्या सुद्धा आयुष्याला नको त्या वळणावर नेऊन सोडू शकतं. आणि आज जर असंकेलं नाही तर तुमच्याआमच्यासारखे लोक या अपरिपक्वतेला नक्कीच बळी पडतील. आणि म्हणून तुम्ही आणि मी बुद्धीने सक्षम होणं एवढ्यासाठी हा अट्टाहास...
No comments:
Post a Comment