Friday, June 5, 2020

आणि मी माणूस म्हणवून घेतो स्वतःला

केरळमध्ये झालेल्या घटनेचा निषेध सगळेच करत आहेत
पहिल्यांदा काय व्यक्त होऊ तेसुद्धा समजायचं बंद झालेलं...पण क्रूर वागताना माणसाला काही वाटत नाही हे परत एकदा सिद्ध झालं आणि मग हे शब्द उमटले....

 
फक्त status मधून व्यक्त होतो
तसा कृतीतून शून्यच आहे मी
स्वार्थी वागत आलोय प्रत्येक वेळेला
आणि मी....माणूस म्हणवून घेतो स्वतःला

मी शिकार करायचो पूर्वी
आता मजा म्हणून प्राणी मारतोय
मी माणूस होतो पूर्वी
आता मालक म्हणून मिरवतोय
मी जिवंत होतो पूर्वी
आता पुरता मरून गेलोय
साधा common senseसुद्धा नाही मला
आणि.... मी माणूस म्हणवून घेतो स्वतःला

उद्या दुनियेचा प्रत्येक जीव विचारेल 
काय चूक आहे नेमकी आमची? 
आधी घर आणि आता जीव घेताय आमचा
कधी भागेल भूक नेमकी तुमची?
माणुसकी नुसती नावाची, भावना कुठायत मला?
आणि.... मी माणूस म्हणवून घेतो स्वतःला

गेला असाल चंद्रावर 
म्हणून एवढा कसला रे माज
आणि काय मिळालं करून 
हे कळू तरी दे नेमकं आज
प्रेम नुसतं स्वतावरचं, बाकी काहीच नाही मला
आणि.... मी माणूस म्हणवून घेतो स्वतःला

मुका होता रे तो जीव, 
नाही सांगू शकला दुःख 
निष्पाप जीव मारण्यात 
काय मिळत नेमकं सुख
संपले सारे प्राणी तरी अजून चैन नाहीच मला
आणि.... मी माणूस म्हणवून घेतो स्वतःला

माणुसकी संपली म्हणून ओरडतो तसा मी रोज 
काय कमी पडलं की मोर्चेसुद्धा काढतो रोज
असा कसा मी नुसता म्हणण्यापूरता शहाणा
निष्पाप जीव मारायला रोज वेगळा बहाणा
प्राणीमित्र संस्था सुद्धा काढायला लागतात मला
आणि.... मी माणूस म्हणवून घेतो स्वतःला

2 4 दिवसात status सुद्धा संपतील
जुन्या गोष्टींसारखं सगळे हे सुद्धा विसरतील
Status पुरत्या गप्पा आणि स्टेटस पुरत प्रेम
उद्या उठून परत तेच पहिल्यासारख same
एवढा अक्कलशुन्य तरी लाजसुद्धा नाही मला
आणि.... मी माणूस म्हणवून घेतो स्वतःला

Tuesday, April 21, 2020

भले होउदे सारा देश बंद



भले होउदे देश सारा बंद
पण आम्हाला त्याच्याशी न द्यायचं न घ्यायचंय
ओरडेनात का पोलीस जिवाच्या आकांताने
पण आम्हाला तरीपण बाहेर उनाड फिरायचय

भले बसुदेत सारे बंद घरामध्ये
आम्हाला तर भाजी साठी का होईना बाहेरच जायचंय
कितीपण मरेनात का कोरोनाच्या विळख्यात
आम्हाला तरीपण बाहेर पडायचं कारण शोधायचंय

होऊदेत बंद जत्रा आणि उत्सवसुद्धा सारे
आम्हाला तरीपण एकत्र यायचंय
एकट्याने बहुतेक होत नसाव्या कसल्याच प्रार्थना
कारण हजारोंनी जमून जीवाशीच खेळायचंय

मोडेनात का सगळे जण जन्माची दुश्मनी
आणि किती का येईनात या युद्धात एकत्र
सारा देश जरी एकत्र लढत राहिला 
तरी आम्हाला मात्र ह्यात धर्मप्रेमच आणायचंय

शहाणपण देगा देवा म्हणून सारेच ओरडतायत
पण काहींना कुणाचं कुठे काय ऐकायचंय?
टिक टॉक वर नको तसले व्हिडीओ करून 
आम्हाला वातावरण पूर्णच बिघडवायचंय

चार दिवस अजून घरात बसलो तर
काय माहीत किती मोठी आपत्तीच येईल!!!
दोन दिवस एकत्र नाही आलो ना तर
काय माहीत किती मोठी जगबुडी होईल!!!

Friday, April 17, 2020

समाज माध्यम आणि वैचारिक परिपक्वता


                 किती कठीण तो जुना काळ
                काहीही कळवायला लागे वेळ
                  आज क्लिक करता एक
                 साऱ्याच गोष्टींचा होईल मेळ

   आताच्या परिस्थितीचे वर्णन अगदी अचूक करणाऱ्या या ओळी. परवा आपल्या लाडक्या व्हाट्सअँप वर एक मेसेज वाचला. काय तर म्हणे लोकांची सामाजिक माध्यमावरची (सोशल मीडिया) सक्रियता कमालीची वाढते आहे.थोडा विचार केला, आणि तोंडातून उद्गार बाहेर पडले,
        'ह्या बातमीपेक्षा या गोष्टीचे अप्रूप वाटते की ही बातमी जिथे वाचत आहोत ते सुद्धा एक समाज माध्यमच आहे. आणि ते सुद्धा सर्वात जलद आणि प्रभावी...'
     आज असा कोणी नसेल ज्याला किमान व्हाट्सएप, फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या समाज माध्यमांचे ज्ञान नसेल. तुमच्या आमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहेत ही सर्व समाज माध्यमे. अगदी लहान मुलांनासुद्धा एक विशिष्ट वर्चस्ववादी वेड आहे असं म्हणायला हरकत नाही. जग जोडायला आणि माणसाला माणसाशी जोडून ठेवण्यासाठी समाज माध्यमांनी आपले महत्त्व नक्कीच सिद्ध केलं आहे. खरं बघायला गेलं तर समाज माध्यमं ही आपल्यासाठी जास्त जुनी नाहीत अगदी अलिकडचीच आहेत. पण आपण त्याला किती बळी पडतोय हे आपल्याला वेगळं सांगायला नको... सर्वांची सकाळ भले भूपाळीने होत नसेल पण गुड मॉर्निग चे मेसेजेस सेंड आणि रिसिव्ह करून नक्कीच होते. एखादा नवीन पदार्थ बनला की तो खायच्या आधी स्टेटस वर जातोच जातो. चवीचं माहीत नाही पण रिप्लाय मिळाला की समाधान नक्कीच मिळतं. अर्थात यात वाईट अस काहीच नाही. समाज माध्यमांचा शोध हा माणसांना जोडण्यासाठीच झालेला आहे यात तिळमात्र शंका नाही. माणसाची खूप अवघड वाटणारी कामे आज चुटकीसरशी शक्य होत आहेत. आणि बहुतेक यातूनच आपला त्यांच्यावरचा विश्वास अधिकाधिक दृढ होत चालला आहे. 
    रोजचीच रोजची कामे करून कंटाळलेले खूप स्टेटस  आपणच ठेवतो आणि जेव्हा अप्रत्यक्षपणे, कुठल्या का कारणाने असेना या साऱ्या रामरागाड्यातून आपणाला उसंत मिळाली तेव्हा पण आपण त्याला कंटाळतो आणि हे व्यक्त होतो सुद्धा त्या स्टेटस मधूनच. मला तर खरच वाटत स्टेटस हेच भाषेपेक्षा आपलं व्यक्त व्हायचं साधन झालंय. पण मूळ मुद्दा हा आहे की आपण काही स्टेटस 'मला किती माहिती आहे आणि मी या गोष्टी कशा सगळ्यांना सांगेन' या उत्सुकतेपोटी ठेवतो आणि मेसेजेस फॉरवर्ड करताना सुद्धा आपल्या डोक्यात बहुधा हेच असतं.
    आज माहितीच्या साधनांमध्ये पुस्तकांच्या बरोबरीला आपला सो कॉलड 'स्मार्ट'फोन येऊन बसलाय. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी सोशल मीडियासारखं प्रभावी माध्यम नाही हे मान्य आहे. पण आज नक्की लिहू वाटत की याचा जितका तुम्हाआम्हाला फायदा आहे त्याहून नक्की जास्त तोटा आहे. तुम्ही आम्ही या फॉरवर्डच्या दलदलीत रुतत चाललो आहे आणि त्यासाठी आपण वैचरिकदृष्टीने सक्षम असणं नक्कीच गरजेचं आहे. आज जेवढ्या तत्परतेने भाजीची निवड करतो, जितक्या उत्तमरित्या नवीन फोन घेताना विचार करतो तसेच मेसेजेस आणि स्टेटस ची निवड करताना तत्पर असणं आवश्यक आहे.
    आपण सारे रोजच ऐकतो की कोरोनासारखा आजार बळावतोय, खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चाललीय आणि बरच काही...आणि जेव्हा वेळ येते थोडासा विचार करायची की आपण सर्वात आधी कुठल्या माहितीवर विश्वास ठेवतो? टीव्ही वरच्या माहितीच्या आधी जिथून माहितीचा कुठलाच पुरावा नाही अशा ठिकाणच्या माहितीवर आपण कसा विश्वास ठेवू शकतो? कोणी तर उठतं, काही तरी बोलत,  अफवा पसरवल्या जातात आणि आपण त्या 'फॉरवर्ड'च्या बटणाचा गैरवापर करून त्या गावभर करायला सज्ज असतोच, हो ना?
   खरंच जर आपण एक जबाबदार नागरिक आहोत तर आपण नको का विचार करायला की ह्या ज्या आणि जेवढ्या बातम्या येतात त्यांची शहानिशा करणं ही नागरिकांची जबाबदारी असते अस नाही का वाटत आपणाला... तुमच्या या चुकीच्या फॉरवर्ड मुळे जर सर्वांमध्ये भीतीच वातावरण होऊन कोणी या माहितीला बळी पडलं तर ते किती भीषण असेल याचा विचार आपण का नाही करत? 
   परवा परवा ची गोष्ट बघा, देश संकटाला संपूर्ण ताकतीने  समोरा जातोय आणि टिक टॉक सारख्या अँप वर बनवलेले विडिओ व्हायरल झाले ज्यामध्ये एका विशिष्ट धर्माचे लोक नोटांना थुंकी लावत होते. आणि नंतर तपासाअंती स्पष्ट झालं की विडिओ 3 वर्षांपूर्वीचा होता पण तोवर समाजामध्ये संबंधित धर्माबद्दल खूप रोष झाला होता आणि त्याला इतर कारणं होती हे ही खरं आहे. पण असे व्हिडीओ नाही का अशा चुकीच्या वेळप्रसंगी चुकीच्या गोष्टी करतील. खरंच आपण का विचार करत नाही की आता जर यामुळे कसलीच गर्दी वगैरे झाली तर हे संकट अजूनच वाढत जाईल? तुमच्याआमच्यासारख्या लोकांवर वस्तुस्थितीपेक्षा जास्त ह्या सोशल मीडियावरच का एवढा विश्वास आहे. कधी आपण एखादी गोष्ट पारखून घ्यायला शिकणार आहे देव जाणे.

                  अजून किती बळी घेऊन 
                संपेल तुझा मूर्खपणा मानवा 
            तुझ्याच चुकांचा परिणाम हा उलटा
               तुझ्या नाशाला कारण मानवा

   हे झालं फक्त कोरोनाचं! कोरोना नव्हता तेव्हा सुद्धा विचारशून्यपणे काही लोकांचे हे असले उद्योग सुरूच होते हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. कुणीतरी चिथावणीखोरपणे बोलावं, कोणी मुर्खपणे एखाद्या महान व्यक्तीबद्दल चुकीचे उद्गार काढावेत तसे व्हिडिओ व्हायरल व्हावे आणि शांत असणाऱ्या समाजाच्या विशिष्ट गटांमध्ये धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण व्हावी, दंगली व्हाव्यात आणि शेवटी सर्वांचंच नुकसान व्हावं हे अगदी नेहमीच झालंय. याचा अर्थ असा नाही की कोणी कुणाबद्दल काहीही बोलावं.... पण ते मेसेजेस आणि विडिओ फॉरवर्ड करण्यापेक्षा कायद्याचा वापर करणं यापेक्षा उपयोगी पडेल हे कळायला का आपली बुद्धी धजावत नाही हाच खरा प्रश्न आहे.
   अगदी उदाहरणादाखल सांगायचं झालं तर भीमा कोरेगावची दंगल झाली त्यानंतर दोन ते तीन दिवस महाराष्ट्र बंद होता. या तणावाचे कारण नाही म्हणलं तरी काही समाजकंटक माणसांनी उठवलेल्या खोट्या अफवा हाच होता. दंगल झाली एका कारणावरून आणि राजकारणाचा आणि जातीचा रंग फासणाऱ्यांनी याच्या परिणामांचा थोडा सुद्धा विचार करू नये?
   आज समाज माध्यमांमुळे रानु मोंडल सारख्या व्यक्ती रातोरात स्टार होतात आणि त्याच गोष्टीच्या नाण्याची दुसरी बाजू म्हणून अशा दंगली आणि मारामाऱ्या होतात. आणि तस बघायला गेलं तर समाजकंटकांना किती दोष देणार तुम्ही.... " नाही ओ, ते आलं होतं व्हाट्सऍप वर आलं होतं" हे कारण देऊन किती दिवस आपण अशा गोष्टींना उत्तेजना किती दिवस देणार आहात. 
   आपलं खरंच उनाड वासरू झालंय, ते उनाड वासरू जे किती भरकटत कुठे जातोय याबद्दल विचार सुद्धा करत नाही. प्रौढ म्हणूवून घेणं वेगळी गोष्ट आहे आणि जाणिवेचं प्रौढत्व येऊन तशी कृती करणं त्याहून वेगळी गोष्ट आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. एक मेसेज फॉरवर्ड करण्याआधी आपण सामाजिक जाणिव राखणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वैचारिक दृष्टीने तितकंच परिपक्व असणं गरजेचं आहे या गोष्टीची जाणीव करून घेणं आज नेटकऱ्यांना नक्कीच गरजेचं आहे. नाहीतर असंच चालू राहील आणि अफवांच्या फॉरवर्ड्स ना आपण बळी पडत राहिलो तर ती कोरोना पेक्षा मोठी शोकांतिका असेल हे मात्र नक्की.
   आज समाजाला जर सुधारायचे असेल तर शिक्षणापेक्षा सज्ञानी आणि विवेकी बनवणं हाच एक उपाय आहे. गैरसमज किंवा समाजकंटकपणा आपल्यासोबत इतरांच्या सुद्धा आयुष्याला नको त्या वळणावर नेऊन सोडू शकतं. आणि आज जर असंकेलं नाही तर तुमच्याआमच्यासारखे लोक या अपरिपक्वतेला नक्कीच बळी पडतील. आणि म्हणून तुम्ही आणि मी बुद्धीने सक्षम होणं एवढ्यासाठी हा अट्टाहास...

Friday, April 10, 2020

आता निर्भय श्वास दे



पाहिले त्यांचे विचार आणि 
जाणवली त्यांची उदासीनता
सन्मानाने जगायला आयुष्य
आता निर्भय श्वास दे...

पुढे साऱ्यांच्या जाताना 
पाय ओढणारे अनुभवले
आता मात्र जग जिंकताना
अजिंक्यत्वाचा वर दे

ऐकले कैक टोमणे आणि
झेलल्या साऱ्याच जखमा
लढून लढून थकेन जेव्हा
मज लढण्याचे बळ दे

पाहिल्या वासनांधांच्या नजरा 
आणि पाहिले विचार त्यांचे धुंद
झुकवायला त्यांना पूर्णतः
कर्तृत्वाचे सामर्थ्य दे

ऐकिली क्रौर्याची परिसीमा
आणि ऐकल्या मर्दुमकीच्या कहाण्या
ती वेळ कधी आलीच तर 
प्रत्युत्तराचे धैर्य दे

हात जो टाकेल परस्त्रीवर
अथवा विचारही करेल तसा
हात मुळापासून काढायचे
मनगटी आमच्या बळ दे

चारित्र्याला खेळणं समजणाऱ्या
नराधमांची नाही कमी
आता मात्र प्रत्येक मुलास 
आई जिजाऊंचे संस्कार दे

अशा प्रसंगी पळणारे
दहशतीला घाबरत असतील 
स्मरून छत्रपतींना एकदा शत्रूवर
तुटून पडण्याची मती दे

आता निर्भय श्वास दे....

Wednesday, April 8, 2020

माझा देश लढतो आहे



ना कोणी हिंदू
ना कोणी मुस्लिम
ना कुठला ख्रिस्ती झगडतो आहे
अस्मानासम संकटासोबत या 
माझा देश लढतो आहे....

बंद झाली देवळे सुद्धा 
अन झाल्यात बंद मशिदी चर्च
लढणाऱ्या प्रत्येक डॉक्टर पोलिसात
आज देव दिसतो आहे
धावा करून त्याच देवांचा यश मागतो आहे
माझा देश लढतो आहे....

ना मराठी ना गुजराती
ना तामिळ ना पंजाबी
एक होऊन भारतीय फक्त
अहोरात्र झुंजतो आहे
अकस्मात ओढवलेल्या या दुःखात
माझा देश लढतो आहे....

ना सत्ताधारी ना विरोधक पार्टीचा
ना कोणी ह्या न त्या विचारसरणीचा
माणुसकीच्या पक्षाचा तिरंगा 
आसमंतात फडकतो आहे
 उभ्या जगाला ऐक्याने लाजवत
माझा देश लढतो आहे....

संपले भाऊबंदकीचे हेवेदावे
आणि भरल्या साऱ्याच जखमा
तोंडही न बघणारे एकमेकांचे 
एकाच घरात नांदत आहेत
नजर न लागो कुणाचीच कधी 
असा बांधव घडतो आहे
माझा देश लढतो आहे....

Saturday, April 4, 2020

कोरोना विषाणूची दुसरी बाजू!


उभ्या जगताच्या सीमांमध्ये 
कधीच ऐसे घडले नाही
जगण्यासाठी काम सोडून 
घरी कोणीच बसले नाही

एकमेकांना जगवण्यासाठी 
कोणीच ऐसे लढले नाही
केले एवढ्याश्या विषाणूने जे,
ते कधी कुणाला जमले नाही

तुझ्याच चुका मानवा तुला
कधीच कश्या कळल्या नाहीत?
आज अशी दुर्दशा झाली 
तरी का त्या थांबल्या नाहीत?

प्रदूषणाला रोखून धरणे
मानवा तुज कधी साधले नाही
आज सारखा श्वास मोकळा
कधी वसुंधरेला लाभला नाही

मानवाच्या चुकांचे असे प्रायश्चित्त
कधीच त्याला मिळाले नाही
उभ्या जगाचे असे स्मशान
आजवर कधीच झाले नाही

मान्य आहे मेलेत कित्येक पण 
माणूस आजसारखा थांबला नाही
दुर्दैव म्हणावे की सुदैव ह्यास 
माझे मलाच कळले नाही

उभ्या जगताच्या सीमांमध्ये 
कधीच ऐसे घडले नाही

Shri Speaks