Friday, June 5, 2020

आणि मी माणूस म्हणवून घेतो स्वतःला

केरळमध्ये झालेल्या घटनेचा निषेध सगळेच करत आहेत
पहिल्यांदा काय व्यक्त होऊ तेसुद्धा समजायचं बंद झालेलं...पण क्रूर वागताना माणसाला काही वाटत नाही हे परत एकदा सिद्ध झालं आणि मग हे शब्द उमटले....

 
फक्त status मधून व्यक्त होतो
तसा कृतीतून शून्यच आहे मी
स्वार्थी वागत आलोय प्रत्येक वेळेला
आणि मी....माणूस म्हणवून घेतो स्वतःला

मी शिकार करायचो पूर्वी
आता मजा म्हणून प्राणी मारतोय
मी माणूस होतो पूर्वी
आता मालक म्हणून मिरवतोय
मी जिवंत होतो पूर्वी
आता पुरता मरून गेलोय
साधा common senseसुद्धा नाही मला
आणि.... मी माणूस म्हणवून घेतो स्वतःला

उद्या दुनियेचा प्रत्येक जीव विचारेल 
काय चूक आहे नेमकी आमची? 
आधी घर आणि आता जीव घेताय आमचा
कधी भागेल भूक नेमकी तुमची?
माणुसकी नुसती नावाची, भावना कुठायत मला?
आणि.... मी माणूस म्हणवून घेतो स्वतःला

गेला असाल चंद्रावर 
म्हणून एवढा कसला रे माज
आणि काय मिळालं करून 
हे कळू तरी दे नेमकं आज
प्रेम नुसतं स्वतावरचं, बाकी काहीच नाही मला
आणि.... मी माणूस म्हणवून घेतो स्वतःला

मुका होता रे तो जीव, 
नाही सांगू शकला दुःख 
निष्पाप जीव मारण्यात 
काय मिळत नेमकं सुख
संपले सारे प्राणी तरी अजून चैन नाहीच मला
आणि.... मी माणूस म्हणवून घेतो स्वतःला

माणुसकी संपली म्हणून ओरडतो तसा मी रोज 
काय कमी पडलं की मोर्चेसुद्धा काढतो रोज
असा कसा मी नुसता म्हणण्यापूरता शहाणा
निष्पाप जीव मारायला रोज वेगळा बहाणा
प्राणीमित्र संस्था सुद्धा काढायला लागतात मला
आणि.... मी माणूस म्हणवून घेतो स्वतःला

2 4 दिवसात status सुद्धा संपतील
जुन्या गोष्टींसारखं सगळे हे सुद्धा विसरतील
Status पुरत्या गप्पा आणि स्टेटस पुरत प्रेम
उद्या उठून परत तेच पहिल्यासारख same
एवढा अक्कलशुन्य तरी लाजसुद्धा नाही मला
आणि.... मी माणूस म्हणवून घेतो स्वतःला