Friday, April 10, 2020

आता निर्भय श्वास दे



पाहिले त्यांचे विचार आणि 
जाणवली त्यांची उदासीनता
सन्मानाने जगायला आयुष्य
आता निर्भय श्वास दे...

पुढे साऱ्यांच्या जाताना 
पाय ओढणारे अनुभवले
आता मात्र जग जिंकताना
अजिंक्यत्वाचा वर दे

ऐकले कैक टोमणे आणि
झेलल्या साऱ्याच जखमा
लढून लढून थकेन जेव्हा
मज लढण्याचे बळ दे

पाहिल्या वासनांधांच्या नजरा 
आणि पाहिले विचार त्यांचे धुंद
झुकवायला त्यांना पूर्णतः
कर्तृत्वाचे सामर्थ्य दे

ऐकिली क्रौर्याची परिसीमा
आणि ऐकल्या मर्दुमकीच्या कहाण्या
ती वेळ कधी आलीच तर 
प्रत्युत्तराचे धैर्य दे

हात जो टाकेल परस्त्रीवर
अथवा विचारही करेल तसा
हात मुळापासून काढायचे
मनगटी आमच्या बळ दे

चारित्र्याला खेळणं समजणाऱ्या
नराधमांची नाही कमी
आता मात्र प्रत्येक मुलास 
आई जिजाऊंचे संस्कार दे

अशा प्रसंगी पळणारे
दहशतीला घाबरत असतील 
स्मरून छत्रपतींना एकदा शत्रूवर
तुटून पडण्याची मती दे

आता निर्भय श्वास दे....

No comments:

Post a Comment